‘निसर्गरूपी’ मायबोली🌼🍀✨

निसर्गाच्या कंपनांत आपली मायबोली दडलेली आहे, याचा प्रत्यय आपल्याला पदोपदी येतो. मराठीचे वैभव निसर्गरूपात गवसल्याची अनुभूती वर्णन करणारी ही काव्यसुमने, खास मराठी राज्यभाषा दिनानिमित्त!

कस्तुराच्या हाकेवरुनी🎶
साद जाई हिमशिखरावर
रानोरानी पानोपानी🍃
घुमतो जिचा नाद प्रखर

धरणीतुनि जणु शुभ्र झरा💦
नितळ जयाचे पाणी
संस्कृती आणि संस्कारांची
समृद्ध शोभित वाणी🙏🏻

सागराची गाज मराठी🌊
घेई गगनी उंच भरारी
सामावेना मात्र नभी या
अन् दुमदुमे अवघ्या अंतराळी💫

बोली ही रानपाखरापरी🕊️
मधुर जिचा भावार्थ स्वर
नवरसांनी नटलेले जिचे✨
अलौकिक साहित्यैश्वर्य

सहज सुलभ जिचा आशय
गवतफुलाचे डोलणे जणू🌸
भरतसे विनम्र भाव कणकणा
दरवळूनी हर वायू-रेणू🍂

तरल, शुद्ध आणि संपूर्ण
शब्दसरिता जी खळखळ✍🏻
फुलवित काठी ‘भाव’ मळे 🌷
ही मायबोली वाहो निरंतर🙏🏻

विहंगकिलबिल, सुह्रृदमैफिल
नात्यांमधला मार्मिक दुवा🌿
पवित्र जी रविकिरणांपरी
उमगवी प्रतिदिन अर्थ नवा🙏🏻

सृजनत्वाच्या गाभाऱ्यातील
सदा तेजोन्मिलित ज्योती🪔
जोडुनिया करकमले वंदू🙇🏻‍♀️
ही विलक्षण माय मराठी!

मराठी राज्यभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏻💐🙏🏻

Design a site like this with WordPress.com
Get started